रामपुरी व विश्वगयाची प्रेरणादायी भेट! लेखक - महारुद्र मंगनाळे

 रामपुरी व विश्वगयाची प्रेरणादायी भेट!

लेखक - महारुद्र मंगनाळे 

...............................................

लोकांना शहाणं करतोय म्हणून पोपटपंची करणाऱ्यांची संख्या समाजात अफाट आहे. वेगळ्या पातळीवर हा ही पोटापाण्याचा धंदाच! स्वत: प्रत्यक्ष काहीच कृती न करता,इतरांनी काय करावं,असं सांगणाऱ्या व्यक्तींपासून मी चार हात दूर राहातो.त्यातही हायफाय समाजसेवक म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांशी संपर्क होऊ नये याची काळजी घेतो.पत्रकार म्हणून असे अनेक भंपक लोक मी बघितलेत.त्यामुळं ओमप्रकाश यादव यांचा मला पहिल्यांदा व्हाट्सएप संदेश आला तेव्हा मी त्याला कोरडेपणाने प्रतिसाद दिला. याचं कारण त्यांच्या मागे जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीओ हे पद होतं. पण दुसऱ्या एका मित्राने कळवलं की,त्यांनी त्यांच्या गावात खूप चांगलं काम केलयं.हजारो झाडं लावून जोपासलीत.मग मी त्यांना रुद्रा हटला यायचं निमंत्रण दिलं.सहकुटुंब आले.त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं की,हे माझ्याच जातकुळीतील आहेत. भरपूर काम करून,सकारात्मक प्रसिद्धी करणाऱ्यांपैकी एक आहेत.त्या भेटीत छान चर्चा झाली. जाताना त्यांनी रामपुरी(बु.)या त्यांच्या गावी येण्याचं निमंत्रण दिलं.मी होकारही दिला.त्यांनी दोनवेळा फोनवर आठवण करून दिली.पण वेळेचा मेळ लागत नव्हता.माझं सततचं पर्यटनही सुरूच होतं.चार दिवसांपूर्वी सेवालयात मुक्कामी असताना, अचानक ठरवलं,शनिवारी रामपुरीला जायचं.रवी बापटले यांनाही आग्रह केला.त्यांनी होकार दिला. ओमप्रकाश यादव यांनाही तसं कळवलं.त्यांनी गुगल मँप टाकला.शनिवारी सकाळीच शिवाजी आपटे या मित्रालाही फोन केला.तो दोन वाजता शेतात पोचला.दुपारी तीन वाजता रवी पोचले.जेवण करून चार वाजता निघालो. सहा वाजता रामपुरी रस्त्यावरील विश्वगया फॉर्महाऊसवर पोचलो.


जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीओ असलेल्या अधिकाऱ्याचं फॉर्म हाऊस कसं असेल,याचं जे चित्र मनात तयार झालं होतं,त्याला काही मिनीटातच तडा गेला.मी रवीला म्हटलंही,हे काही कोण्या अधिकाऱ्याचं नाही तर,ओमप्रकाश यादव या वृक्षवेड्या व्यक्तीनं शेतात बांधलेला निवारा आहे.यादव सर यांना पोचायला वेळ होता.दोन एकरवरील हे फॉर्म हाऊस तिघांनी बारकाईने पाहिलं.सगळ्या प्रकारची फळांची झाडं. आंबा,पेरू,चिकू,फणस,बोर,नारळ,केळी शेवगा,चिंच ही झाडं दाटीवाटीने लावलेली.चिकूला भरपूर फळं लागलेली.विविध जातीच्या आंब्याना मोहोर लगडलेला. बघताक्षणी लक्षात येतं की,ही झाडं लावताना व्यावसायिक विचार केला गेलेला नाही. फळझाडांचंही जंगल तयार केलयं. हा जंगलप्रेमी माणूस आहे.



झाडांना पुरेसं पाणी मिळत नसल्याचं लक्षात आलं.बागेच्या देखभालीसाठी एक जोडप तिथं राहातं. त्याच्यासाठी एक पत्र्याचं शेड.त्याच्या पलिकडं दुधाची म्हैस बांधलेली.एक कुत्रा भूंकत भूंकत सभोवती फिरत होता.फॉर्महाऊसचा आत प्रवेशाचा रस्ता नारळाच्या फांद्यांनी झाकून गेलेला.उजव्या हाताला घरी खाण्यासाठी विविध भाज्या, कांदा लावलेला.अर्ध्या तासात झाड न् झाड बघितलं.फोटो काढले. फॉर्म हाऊसजवळच्या बाजेवर बसलो.मी आणि शिवाजीने काळा चहा घेतला.फ्रेश होण्यासाठी आत गेलो.खाली एक छोटीशी खोली.तिच्यात शेतमालाची पोती भरलेली.त्याच्या बाजुला संडास-बाथरूम. मी आत जायच्या आधी मुलाने दोन बकेट पाणी, आणून ठेवलं.इंडियन टॉयलेट.अद्याप इथं पाईपने पाणी आलेलं नव्हतं. रूमवर लांब जाडजुड पत्रा टाकलेला. त्यावर पत्र्याचंच एक छोटसं शेड...झालं फॉर्महाऊस. ओमप्रकाश यादव ही व्यक्ती समजून घेण्यासाठी हे बघणं गरजेचं होतं.यादव पती-पत्नी दोघेही क्लास वन अधिकारी आहेत.त्यांना हायफाय, चकाचक घर बांधणं सहज शक्य होतं,आहे.पण त्यांनी विचार केला,त्याची गरज काय? सध्या तरी महिन्यातील एखादा सुट्टीचा शनिवार-रविवार गाठूनच ते येणार होते..त्यासाठी अनावश्यक खर्च कशासाठी?..नाही तरी माणसाच्या अत्यावश्यक अशा गरजा किती?....मला हे भावलं.


आम्ही निवांत बसलो असतानाच, दिनेश थोरात या मित्रासोबत ते आले.गप्पा सुरू झाल्या. वडील शेतकरी. सगळी मुलं उच्चशिक्षित होऊन चांगल्या पदावर जायला हवीत ही इच्छा. त्यापोटी सतरा एकर जमीन विकली.

ओमप्रकाश भावांमध्ये सर्वात मोठे.जिद्दीने शिक्षण घेतलं.पीएचडीचं काम शेवटच्या टप्प्यात होतं.तरीही दोन छोट्या भावांच्या शिक्षणाला हातभार लावता यावा म्हणून अनिच्छेने पीएसआयची नोकरी पत्करली. त्यात फारसे रमले नाहीत. याच काळात अभ्यास करून ते एमपीएससी झाले. त्यांना सहचारिणीही अशीच लाभली.दोन्ही भाऊ डॉक्टर झाले आणि ओमप्रकाश यादव विविध ठिकाणी सेवा बजावू लागले...ज्या गावानं आपल्याला घडवलं,त्या गावाचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी केला.गावातील तरूणाईला सोबत घेऊन वृक्षारोपणाची व्यापक मोहीम राबवली. विविध शासकीय योजनांचा लाभ गावाला मिळवून देऊन, त्याचा कायापालट केला.एखाद्या तालुक्याच्या शहरात नसतीलं एवढ्या सुविधा रामपुरीत निर्माण केल्या. गाव जवळजवळ हागणदारीमुक्त केलं....त्यांच्याशी ही चर्चा सुरू असतानाच मी म्हटलं, चला..तुमचं हरीत ग्राम रामपुरी बघायचंय.


फॉर्म हाऊसवर मुक्काम ठरला असल्याने, निवांत वेळ होता.गप्पा मारत आम्ही पायीच निघालो. झाड लावणं फोटोत येण्यापुरता कौतुकाचा विषय.पण लावलेली रोपटी जेव्हा वृक्ष बनतात,तेव्हा त्याचा आनंद काही औरच असतो.गावात जाताना रस्त्याच्या दूतर्फा वाढलेली झाडं दाखवताना यादव यांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता.प्रत्येक रोपासाठी लावलेले ट्रीगार्ड,ठिबकद्वारे त्यांना पाणी देण्याची केलेली व्यवस्था हे सगळं बघत आम्ही चाललो होतो.झाडांना विविध महापुरुषांची नाव दिलेल्या पाट्या लावल्या होत्या.गावात प्रवेश केल्यानंतर नजरेत भरतात ते प्रशस्त रस्ते.प्रत्येक घरासमोर दिसणारी झाडं.हा लोकसहभाग मिळवणं किती कठीण आहे, याचा मला अंदाज आहे.पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत,कर्मचाऱ्यांसाठीची क्वार्टर्स बघत आम्ही फिरत जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ आलो.पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळेची ही भव्य दुमजली इमारत बघून आम्ही थक्क झालो. मी एवढं फिरतो.ठिकठिकाणच्या शाळा,ग्रंथालये बघतो.चकाचक खाजगी शाळा आहेत.पण जिल्हा परिषदेच्या शाळेची अशी इमारत मी पहिल्यांदाच बघत होतो.कलाशिक्षकांनी विविध सुविचार व माहितीपूर्ण मजकुराने शाळेच्या भिंती सुशोभित केल्यात.याच इमारतीच्या बाजुला शाळेची जुनी इमारत आहे.ती मोडकळीस आलीय.याच शाळेत ते शिकलेत.मैदानात भव्य वटवृक्ष आहे.त्याला मजबुती यावी म्हणून त्याच्या पारंब्यांना आधार दिलाय. या शाळेलगतची मुलींसाठीची अद्ययावत अभ्यासिका बघून कोणाचेही डोळे दिपतील.४०मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र सोय...भविष्यात गरज पडली तर एसी लावण्याचीही सुविधा....या अभ्यासिकेचा गावातील मुलींनी लाभ घेतला तर,कितीतरी मुलींचं आयुष्य बदलून जाईल...पण हे होईल का?...हा मनात निर्माण झालेला प्रश्न मी ओठावर आणला नाही. याच परिसरात दोन अंगणवाड्यांच्या भव्य इमारती आहेत.त्याच्या बाजुला झाडांची गर्दी.गावातील मंदिरांसमोर मोठे शेड मारून,सभागृहासारख्या जागा केल्यात.लोकांना लग्नसमारंभासाठी स्वस्तातील हक्काची जागा निर्माण झालीय.


रामपुरी हे गोदावरीच्या काठावर वसले असल्याने, त्याला नैसर्गिक सौंदर्य लाभलयं.

काठावर एकाच ठिकाणी विविध मंदीरं आहेत.देवदर्शनाला येणंही कठीण अशी या भागाची अवस्था होती.विविध शासकीय योजना आणि लोकसहभागातून त्यांनी या भागाचा कायापालट घडवून आणलाय. मंदिराशेजारी स्मृती उद्यान विकसित केलयं.हे सगळं आम्ही बघितलं.नदीच्या काठावर जाण्यासाठी दोन् बाजुने पायऱ्या केल्यात. एक स्मशानभूमीही आहे.पायऱ्या उतरून आम्ही खाली गेलो.काठावर फिरलो.यावर्षीच्या पावसाळ्यात पाणी मंदिरालगतच्या खडकांना खेटून गेल्याच्या खुणा दिसत होत्या. पलिकडच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आल्याची माहिती सोबतचा तरूण देत होता.ठिकठिकाणी आमची फोटोग्राफीही सुरू होती.


ठळकपणे लक्षात येणारी बाब म्हणजे ,गावातील सर्व भागात प्रशस्त रस्ते आहेत. दलित वस्तीतील रस्तेही आम्ही बघितले. तसेच मोठे.छोट्या बोळांमध्येही सिमेंटचे रस्ते आहेत. ओमप्रकाश यादव यांनी शासकीय योजना गावासाठी आणल्याच शिवाय त्यांची अंमलबजावणी दर्जेदारपणे करून घेतलीय.गावातील रस्ते बघताना, हे ठळकपणे जाणवत होतं.आम्ही पाच-सहाजण पायीच फिरत असल्याने, साहेब आहेत असं कोणाच्या फारसं लक्षातही आलं नाही. गावचा कोपरा न् कोपरा प्रत्यक्ष बघून आम्ही फॉर्म हाऊसवर पोचलो तेव्हा या चालण्याची नोंद पाच किलोमीटर झाली होती.सतत अडीच तास आम्ही फिरत होतो...यादव सर म्हणाले, तुम्ही पहिले आहात की ज्यांनी एका भेटीत हे सगळं बघितलं...आणि माझीही पहिली वेळ असावी एकावेळी एवढं पायी फिरलो!


रात्रीचे नऊ वाजून गेल्याने,माझी आणि रवीची झोपेची वेळ झाली होती.गरमागरम भाकरी ,बैंगण फ्राय, बेसन ,पातीचा ताजा कांदा असं साधंच पण चवदार जेवण केलं. मचाणवर मोकळ्या हवेत आकाशाकडं बघत गप्पा मारत झोपलो.रात्रीचं सांगीतलं होतं,चहा न घेता जाणार.पहाटे पाचला उठून,फ्रेश झालो.साडेपाच वाजता गाडी बाहेर पडली.सकाळी साडेसात वाजता मी आणि शिवाजी शिरूरला उतरलो.रवी सेवालयाला गेले...रवी आणि शिवाजी दोघेही म्हणाले, ही भेट आमच्यासाठी प्रेरणादायी अशीच राहिली... तुम्ही आग्रह करून नेलात म्हणून ही संधी मिळाली.


आमच्या भेटीचा आनंद ओमप्रकाश यादव यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत होता.समविचारी, झाडांवर जीवापाड प्रेम करणारी माणसं या निमित्ताने एकत्र आली,ही बाब या कामाला बळ देणारी आहे!

Comments

Popular posts from this blog

प्रतिभावंताच्या प्रदेशात - राजा पुजारी

माझं गाव माझं तीर्थ