माती आडवा पाणी जिरवा च्या माध्यमातून कडवंची झाले समृद्ध
कडवंची हे गाव जालना शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असून सुमारे 455 कुटुंब व 3000 लोकसंख्या असलेले गाव आहे. कडवंची गावाची एकूण क्षेत्रफळ भौगोलिक क्षेत्रफळ 1807 हेक्टर एवढे असून लागवडी योग्य क्षेत्र सुमारे 1400 हेक्टर आहे.1995 पूर्वी म्हणजे फक्त 167 हेक्टर क्षेत्र( 13 टक्के) बागायती होते. कडवंची गाव अवर्षण प्रवण क्षेत्रात असून वार्षिक सरासरी पाऊस सुमारे 450 मिलिमीटर एवढा पडतो. 1995 पूर्वी या गावातील 400 ते 500 लोक ऊस तोडण्यासाठी बाहेर जात असत.
![]() |
| दि. 21 ऑक्टोबर 2020 रोजी शासकीय दौऱ्यानिमित्त कृषी विज्ञान केंद्र जालना यांचे पाणलोट क्षेत्र विकास मॉडेल कडवंची या गावी भेट देण्याचा योग आला. |
यावर एकच उपाय होता तो म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास. श्री विजय अण्णा बोराडे यांच्या दूरदृष्टीतून, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या पुढाकारातून व नाबार्डच्या अर्थसहाय्याने पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये माथा ते पायथा अशाप्रकारे काम करण्यात आले, असे श्री. वासरे कृषी अभियंता तथा प्रकल्प संचालक कडवंची यांनी सांगितले.
कडवंची येथील जलसंधारणाचे वैशिष्ट्य म्हणजे माती आडवा पाणी जिरवा हा मूलमंत्र याठिकाणी वापरण्यात आला, म्हणजेच भूसंवर्धनातून जलसंवर्धन यावर काम केले गेले.
माथ्यावर सी सी टी घेण्यात आल्या त्याच्या बाजूला वृक्ष लागवड करण्यात आली. नाल्यावर सिमेंट नाला बांध (CNB) घेण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व शेतजमिनीवर कंपार्टमेंट बंडिंग म्हणजेच बांधबंदिस्ती हे काम घेण्यात आले. सुमारे 1300 हेक्टर इतक्या मोठ्या जमिनीवर बंडिंग करण्यात आली. यासोबतच इतर पाणलोटाचे उपचार सुद्धा केले गेले. पंचवीस वर्ष होऊन सुद्धा शेत जमिनीची बांधबंदिस्ती अतिशय सुस्थितीत असल्याचे दिसून आले. सिमेंट नाला बांधा ला भेट दिली असता अतिशय स्वच्छ पाणी यातून वाहत होते, कुठल्याही प्रकारचा गाळ याठिकाणी जमा झाल्याचे दिसून आले नाही याचा अर्थ पाण्याचा प्रत्येक थेंब शेतामध्येच जिरवला जातो फक्त झिरपून आलेले पाणीच सिमेंट नाला बांध मध्ये येते. त्यामुळे CNB आज सुध्दा गाळ मुक्त आहेत. हीच माथा ते पायथा पाणलोट क्षेत्र विकासाची शास्त्रीय पध्दत आहे.
हे सर्व उपचार करून मोठ्या प्रमाणात भूसंवर्धन व जलसंवर्धन होते तरीही गावाचा ॲक्विफर जास्त खोल नसल्यामुळे जास्तीचा पाऊस झिरपून जायचा व एप्रिल-मे मध्ये पाण्याची कमतरता जाणवायची. त्यामुळेच हे वाया जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी शेततळ्याचा पर्याय पुढे आला. आवश्यकतेनुसार प्रत्येक शेतकऱ्यांनी शेततळे घ्यायचे ठरवले. आज कडवंची या गावांमध्ये सुमारे 650 शेततळे आहेत. म्हणजे सरासरी एक ते दोन शेततळे प्रत्येक कुटुंबाकडे आहेत. कडवंची म्हणजे शेततळ्याचं गाव असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रत्येक शेतकऱ्याकडे एक विहीर आहे. दरवर्षी होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार वॉटर बजेट करण्यात येते व त्यानुसार द्राक्षा व्यतिरिक्त कोणकोणती बागायती पिके घ्यायची हे सर्व गाव मिळून ठरवते आणि याबाबतचा तांत्रिक सल्ला कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना मार्फत दिला जातो.
![]() |
| द्राक्ष बाग |
ज्या गावांमध्ये सन 1995 ला फक्त 13 टक्के (167हेक्टर) एवढी बागायती जमीन होती, ती आज सुमारे 46 टक्के पर्यंत वाढली असून एकूण बागायती पैकी पाचशे हेक्टर एवढ्या जमिनीवर द्राक्ष लागवड केली जाते व त्यातून विक्रमी उत्पन्न काढून शेतकरी सदन झालेले आहेत. आज गावातील 95 टक्के लोक शेतीमध्ये टुमदार घर बांधून राहतात.
![]() |
| शेतामधील टुमदार घर |
गावातील कुणीही इतरत्र कामासाठी स्थलांतरित नाही उलट मध्य प्रदेश, छत्तीसगढ बिहार इत्यादी ठिकाणाहून शेकडो लोक कडवंची येथे कामासाठी आलेली आहेत. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच मोठे उद्योग लॉक डाऊनमुळे बंद असले तरी या गावांमध्ये शेती उद्योगात करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याचे दिसून आले.
शेत शिवारातून फिरत असताना सर्वत्र द्राक्षाच्या बागा दिसत होत्या आपण मराठवाड्यात आहोत यावर विश्वास सुद्धा बसत नव्हता, बघेल त्या दिशेला शेततळे दिसत होती.
![]() |
| सरपंच श्री चंद्रकांत क्षीरसागर यांच्यासोबत कडवंचीबाबत फार्म हाऊस वर चर्चा करताना |
विजय आण्णा बोराडे यांच्या दूरदृष्टीतून व कडवंची ग्रामस्थांच्या लोकसहभागातून हे शक्य झाले असे गावचे सरपंच चंद्रकांत क्षिरसागर यांनी सांगितले.
© ओमप्रकाश मं. यादव
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं)
जिल्हा परिषद, परभणी




खरच माझं गाव माझं तीर्थ समजून समृद्ध ग्राम समृद्ध देश होण्यास मदत होईल
ReplyDeleteखूप छान सर यातून गाव समृध्द करण्यासाठी मदत होईल
ReplyDeleteप्रत्येक गावात सदर उपक्रम राबवल्यास गावे समृद्ध होतील.
ReplyDeleteसर, ब्लॉग वरील माहिती खूप सुंदर आहे...
ReplyDeleteआपण नेहमीच काहीतरी वेगळे करून लोकजागृती करण्याचे कार्य करीत असतात...
आपल्या कार्यास अनेक शुभेच्छा...
असेच लोक कल्याणकारी उपक्रम आपले हातून घडावेत अशी आशा व अपेक्षा व्यक्त करतो....